इलेक्शन म्हणजे लोकशाहीचा उत्सव वैगेरे. दिल्लीच मोठ्ठं इलेक्शन आहे, मोदी - राहुल गांधीच इलेक्शन! जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे म्हणे ! अतिउच्च श्रीमंत शिक्षित लोकांना नाही वाटतं कधी तो आपलासा, पण शिकलेल्या मध्यमवर्गीय लोकांना उजवी , डावी, विचारसरणी कळायला लागते. मग या मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या जाती धर्माप्रमाणे त्यांचे महापुरुष, हिंदु, मुस्लिम, ब्राम्हण, दलीत... इतिहासातील भांडण आणि वैचारिकता संपत नाही!
शाळा - कॉलेजात पांढरपेशा नोकरी करणाऱ्या लोकांमधून गांधी - गोडसे संपत नाही, मोदीने देश वाचवला का विकला, राहुल गांधी पप्पू आहे का उच्चशिक्षित यावरून मग वैचारिक वाद वैगेरे होतात.... मोदीचा ताणाशहा दिसतो तर कोणाला इंदिरा मध्ये आयर्न लेडी दिसते तर कोणाला आणीबाणी आठवते.
गावाच्या कट्ट्यावर बसून गावात २-४ वेगवेगळ्या पार्ट्या तालुक्याच्या नेत्याला धरून असतात, त्यांचे फुटलेले २-४ पक्ष, गावात भाव - भावकितील वाद विवाद, आमदारांच्या - मंत्र्यांच्या संस्थांवर, शाळा - कॉलजेवर नोकऱ्या करणारे कट्टर असतात, त्यांचं मतदान फिक्स असतंय. गावातील मोठ्या पुढाऱ्यांच्या आसऱ्याने जगणारे काही उच्चवर्णीय गरीब सामजिक सुरक्षिततेच्या नावाखाली स्वतःला विकून टाकतात. ८-१० दिवस ढाबा,हॉटेल पार्ट्या, फुकट भेटणारी चपटी, स्थानिक नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना भेटणारी इंग्लीश आणि आपला नवरा गावात मोठा पुढारी आहे, आणि त्याने सांगितले बटण दाबून येणारी सक्षम झालेली महिला. वाड्या - वस्त्यावरून टेंपो, नेत्यांच्या गाड्या अन् भेटलं त्याने आया - बाया, म्हातारी माणसं भरून नेतात इलेक्शन बूथ पर्यंत. त्या टेंपो मध्ये एखादं लहान लेकरू पण असतं, गावात त्याला कोणीतरी गारिगार देतं ! समोर दिसणारा पोलिंग एजेंट म्हणून असणारा बाप त्या पोराला लई पावरफुल वाटतो...
भ्रष्टाचार करून जमवलेल्या पैशामुळे डायबिटीस आणि बिपीची गोळी खाऊन, गावाच्या कट्ट्यावर, रस्त्यावर अधून मधून कुठेतरी सरकारी नोकरदार दिसतात, 5-50 हजार पगारात भ्रष्टचार करून 40-50 लाखाची प्रॉपर्टी कमावून देशाच्या संपत्तीला घोडा लाऊन सुद्धा आपण गोरगरिबांना लुटलं नाही याचा लई अभिमान असतोय त्यांना. आपण कसे सोज्वळ निःपक्ष आणि शहाणे आहोत हे दाखवण्यावर त्यांचा जोर बेक्कार असतोय.
गावात कुठल्या तरी कोपऱ्यात आमच्या सारखे शहरात जगायला आलेले लोकं पण दिसतात, सोशल मीडियावर आमच्या सारख्या लोकांनी कितीही मोठ्या मोठ्या बाता मारल्या तरी, गावात भावकीच्या - बापाच्या, लोकल नेत्यांच्या इज्जतीच्या प्रश्नासाठी मग आम्ही उजवी - डावी विचारसरणी येताना वेशीवरच टांगूनच येतो.
इलेक्शनचा निकाल लागतो, अर्ध्या गावावर गुलाल उधळतो, अर्धा गाव हार - जित असती म्हणून निवांत राहतो, लोकं काम धंद्याला लागतात...... दिल्लीच्या तख्तावर लोकशाहीच्या गोंडस नावाखाली एक नवा राजा बोकांडी बसलेला असतो. पुढची पाच वर्ष मग गल्लीपासून - दिल्लीपर्यंत, कॉलेजच्या कट्ट्यापासून सरकारी कार्यालायापर्यंत, गांधी - गोडसे, सावरकर, मोदी, राहुल अशा चर्चा होतं राहतात. अशा या प्रक्रियेत लोकशाहीशी घंटा काही संबंध नसला तरी शाळेच्या पुस्तकातून, आधुनिक ग्रंथांमधून लोकशाहीचं गोंडस थोतांड शिकवायला बरं पडतं!
आंतरराष्ट्रीय मीडियात एवढ्या मोठ्या देशात लोकशाही यशस्वी झाल्याची बातमी वैगेरे होते, लोकशाही पुजली जाते, रखरखत्या उन्हात ज्वारीची चिपाड गोळा करताना, आपण निवडून दिलेल्या नेत्यांचं एसी विमान कधीतरी आकाशातून आवाज करत निघून जातं...उन्हाच्या ज्वाळांनी ते विमान पण काय दिसतं नाही.. काल - परवा पर्यंत गरिबाच्या घरात, गावाच्या कट्ट्यावर हात जोडणारा नेता, आकाशात, बाहेरच्या देशात कसा जातो...... याचा मेळ काय लागत नाही.
अन् हा डेमॉक्रॅटिक देश चर्चा करत राहतो !
✍️ उदयसिंह वीर